24/04/2026
'एट थाउजंडर' चं गारुड
--------------------------------------------
गेल्या वर्षी 'एव्हरेस्ट बेस कॅम्प' (AI च्या भाषेत EBC) चा बर्फ भाळी लावल्यामुळे 'अष्ट हजारी' हिमालय पद भ्रमणा ची चटक जी एकदा लागली ती लागलीच. ती काही सहजा सहजी सुटत नाही. आता रीती प्रमाणे EBC नंतर 'अन्नपूर्णा बेस कॅम्प' (ABC) करणं हे शास्त्र आहे, पण हावश्या नवश्या ची गर्दी टाळणं हेच आमचं प्रमुख शास्त्र असल्यामुळे थोडा शोध सुरु केला आणि नेपाळ मधल्या तुलनेनी अपरिचित आणि दुर्लक्षित अशा गुरखा क्षेत्रातला एक अफलातून अनवट मार्ग सापडला, तो म्हणजे माउंट मनास्लू 'Mountain of Spirit' ह्या जगातील आठव्या क्रमांकाच्या शिखराला प्रदक्षिणा घालणे.
वाचल्यावर थोडं साशंक झालो कारण 8100 मिटर उंच शिखराला प्रदक्षिणा ही संकल्पना कितीही रोमहर्षक असली तरी त्याची व्याप्ती काय असते त्याची कल्पना EBC मध्ये आलीच होती.पण हे एट थाऊजंडर चं गारुड काही स्वस्थ बसू देईना आणि मनाचा हिय्या करुन निघालो. कल्पना केल्या प्रमाणे अत्यंत खडतर आणि शारीरिक क्षमतेचा कस बघणारी ही प्रदक्षिणा मनास्लू चं चहू बाजूनी दर्शन घडवते. बेस कॅम्प जवळ असलेलं फिरोजी रंगाचं तळं आणि त्याच्या मागे उभा असलेला हा स्थितप्रज्ञ् Mountain of spirit आपलं मन शांत करतो. हिमालयातली अती उंचीवरची खिंड ओलांडणे हा पुढचा महत्वाचा टप्पा. ही खिंड अक्षरशः लढवावीच लागते. 25 डिग्री कोनात चढ आणि उतार केल्यानंतर मनास्लू ची पश्चिम बाजू आणि तिची बहीण अन्नपूर्णा-2 चं दर्शन होतं आणि आपण कृतकृत्य होतो. आणि काय लिहू. हे Eight Thousander चं गारुड असंच आमच्या मनावर सतत चढलेलं रहो 🙏🏻